ही कथा आहे एका अशा संतांची ज्यांनी आपल्या भक्तीने आणि साधनेने 'कोंडय्या' ते 'परमहंस सद्गुरू स्वामी कोंडय्या महाराज' असा थक्क करणारा प्रवास केला. धाबा (जि. चंद्रपूर) या गावी जन्मलेल्या या बालकाचा प्रवास आध्यात्मिक उंची गाठणारा होता.
मल्लय्यास्वामींच्या घरी जन्मलेल्या कोंडय्यामध्ये बालपणापासूनच वेगळेपण होते. खेळण्या-बागडण्याच्या वयात ते शांत चित्ताने ध्यानस्थ बसत. घराण्यातील शिवभक्तीचा वारसा त्यांना लाभला होता. बालपणीच त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज पाहून लोक थक्क व्हायचे. त्यांना सांसारिक गोष्टींपेक्षा देवाच्या भक्तीत अधिक रस होता.
वयात आल्यावर कोंडय्यांचे मन संसारात रमेनासे झाले. "मी कोण आहे?" आणि "जीवनाचे अंतिम सत्य काय?" ' शिव ' भेटीसाठी ते आतुर झाले होते.या शोधात त्यांनी गृहत्याग केला. त्यांनी घनदाट जंगलातुन प्रवास करीत विभाजणापूर्वीचा आंध्र प्रदेशातील श्री शैल्यम येथील
गुहांमध्ये कठोर तपश्चर्या केली. असे म्हटले जाते की, अन्नाशिवाय केवळ ईश्वराच्या ध्यानात ते मग्न राहात.अनेक वर्ष लोटली आणि येथेच त्यांना शिवाचे दर्शन झाले.त्यांच्या साधनेमुळे त्यांना अनेक सिद्धी प्राप्त झाल्या होत्या.पण त्यांनी कधीही त्यांचा गर्व केला नाही. उलट, त्या शक्तीचा वापर त्यांनी जनकल्याणासाठी केला.कोंडय्या महाराज गावोगावी फिरून लोकांना नामस्मरण आणि नीतीमत्तेचे महत्त्व पटवून देऊ लागले.दीन-दुबळ्यांची सेवा हाच त्यांनी आपला धर्म मानला.
'परमहंस' म्हणजे अशी अवस्था जिथे व्यक्ती सुख-दुःख, मानापमान आणि मोह-माया यांपासून पूर्णपणे मुक्त होते. कोंडय्या महाराजांनी आपल्या इंद्रियांवर विजय मिळवला होता. त्यांची दृष्टी समभावी झाली होती. यामुळेच लोक त्यांना केवळ 'कोंडय्या' न म्हणता 'परमहंस स्वामी' म्हणून ओळखू लागले.
हा प्रवास सोपा नव्हता कारण यात कडक थंडी, वारा, पाऊस यांची पर्वा न करता केलेली साधना आणि स्वतःच्या अहंकाराचा पूर्ण त्याग होता. धाबा गावातील तो कोंडय्या आपल्या अथांग भक्तीमुळे, साधनेमुळे आज लाखो भक्तांचे श्रद्धास्थान बनला आहे.
"देहाने मानवी असूनही कर्माने दैवी होणे, हाच त्यांच्या कोंडय्या ते परमहंस प्रवासाचा सारांश आहे."


0 टिप्पण्या