लोहारडोंगरी खाण, फायदे आणि नुकसान, बघा विडिओ

 


अरावली पर्वत श्रुंखला, केवळ दगडानी बनलेला पहाड नाही.700 किमी लांब असलेल्या या पर्वतानी थार वाळवंटाला  पुढे सरकू दिले नाही.ही पर्वत रांग नसती तर दिल्ली, मध्यप्रदेश, हरियाणा,उत्तर प्रदेश्यातील काही भाग वाळवंट झाले असते.वायू प्रदूषण टोकावर गेले असते. त्यामुळेचं अरावली पर्वत रांगाना वाचविण्यासाठी सामान्य माणूस रस्त्यावर उतरला. काहीसा असाच प्रकार चंद्रपुरात होत आहे. येथे माणसा ऐवजी वन्यजीव आहेत. या मुक्या प्राण्यांच्या जीवावर उठलेल्या संकटाची त्यांना कल्पना नाही. असेलच तर ते विरोध करू शकत नाही. केलाच तर त्यांची भाषा कुणाला कळेल? हा खरा प्रश्न आहे.

पर्यावरणाचा ऱ्हास,यालाच विकासाची पहिली पायरी समजलं,तर याचा गांभीर्याने विचार करायला हवे.सध्याचे सरकार झाडांची कत्तल, पहाड खोदण्यावर अधिक भर देऊ लागले आहे.अरवाली पर्वत श्रुंखला असो की सुरजागड.याला स्थानिकांनी प्रखर विरोध केला. या विरोधाला सरकारने गंभीरतेने घेतले नाही.सुरजागड खाण उभी राहिली.हे म्हणता येईल की, या खाणीने काही हातांना रोजगार दिला.त्यासोबतच अनेक प्रश्न, समस्या निर्माण केल्या आहेत.गडचिरोली जिल्हातून उठलेला आवाज हरवीला,दुसऱ्या शब्दात म्हणता येईल, आवाज दडपला गेला.आता चंद्रपूरातून सरकार विरोधी सूर उमटू लागला आहे.कारण ठरली जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात लोहार डोंगरी गावाजवळ होणारी प्रस्तावित लोह खाण.


जर ही खाण झाली तर फारच थोळ्या हातांना रोजगार मिळेल. मात्र निसर्गाची मोठी हानी होईल, यात शंका नाही. वन्यजीव बेघर होतील.मात्र यांची चिंता कुणाला पडली आहे.जे वृक्ष आपल्याला ऑक्सिजन देतात, त्या वृक्षावर सहजपणे आपण कुऱ्हाड चालवीत असतो. ही खरंतर मानवाची क्रूरता आहे.ज्या वाघामुळे चंद्रपूरची ओळख सातासमुद्रपार गेली, तेच वाघ आज संकटात आहे. केवळ वाघचं नाही, मानवानी केलेल्या चुकामुळे वाघ-मानव संघर्ष टोकाला पोहचला आहे. यावर प्रभावी उपाययोजना व्हायला हवी. तसे न होता वाघ, वन्यजीवांचा आवास असलेले जंगल नष्ट करण्याची अघोरी कृती आपण करीत आहोत. लोहार डोंगरी येथे मोठ्या प्रमाणात लोह खनिज आहे.हे खरे, दुसरीकडे ही डोंगरी वन्यजीवांचे सुरक्षित आवास आहे, त्याचे काय ? या मुक्या प्राण्यांना हक्काची जागा नसेल तर ते गावाकडे येतीलच.आणि मग संघर्ष ठरलेला.या संघर्षात मानव आणि वन्यजीव यांचे बळी ठरलेलेच.अश्या डोंगरीवर केवळ दगड नसतात, असते हिरवं रान. ज्याला निर्माण करायला निसर्गाला शेकडो वर्ष लागतात.यांच्यावर कुऱ्हाड उचलणे म्हणजे येणाऱ्या मानवी पिढीच्या आयुष्यातील अनेक वर्ष गिळंकृत करण्यासारखे आहे.याचा विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या