विदर्भ राज्य आंदोलन : माणसं जागले नाहीत, की जागविण्यात नेते अपयशी ठरलेत




 स्वतंत्र विदर्भ राज्य ही काळाची गरज आहे. खरंतर विदर्भात येणाऱ्या 11 जिल्ह्यातील जनतेनी हा विषय फारच गंभीरतेने घ्यायला हवा होता. विदर्भाकडे सर्वकाही असूनही हा विदर्भ मागासलेपणाची मळकट चादर ओढून उदास चेहरा घेऊन बसला आहे. आता पुढे काय, या चिंतेची पिवळी हळद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येतेय. अनेक नेते आलेत, स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आवाज उठविला. हे खरे, आजची स्थिती काय ? आंदोलनाची धग फारच कमी झाली की काय? असंच चित्र रविवारला नागपुरात बघायला मिळालं. विदर्भात एकूण 11 जिल्हे आहेत. या जिल्ह्यातून किमान हजार, दोन हजार जरी लोक नागपुरात आले असते, तर महाराष्ट्र सरकारला आपली ताकद दिसली असती. दुदैवाने तसं झालं नाही. गर्दी फारच कमी होती. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मिती माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, अशी ओरड ज्यांनी दिली ते तथाकथित विदर्भवादी नेते महाराष्ट्रातील राजकारणाचे गुलाम झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रातील शेवटच्या टोकावर असलेल्या राजूरा येथील एक विदर्भवादी नेता ऍड. वामनराव चटप ही लढाई एकाकी लढताना दिसत आहे. अर्थातच त्यांच्या या लढाईत प्रामाणिक विदर्भवाद्यांची भक्कम साथ आहे. खरा प्रश्न हा की कधी स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी रान उठवणारे नेते गेलेत कुठे?


कश्याला हा आटापिटा...


 एखादं ध्येय घेऊन जगणारा माणूस पाठीमागे किती गर्दी आहे, हे बघत नाही. तो आपलं ध्येय गाठण्यासाठी तो स्वतःचे घर जडतो आणि स्वतःही राख होतो. हे कश्यासाठी ?  कारण त्याला कळलं असतं की आपण मागास का आहोत. हा मागासलेपणा त्याच्या एकट्याचा नसतोच. त्याचा डोळ्यापुढे लाखो, करोडो माणसे उभे असतात. तो या माणसांसाठी लढत असतो. त्यांच्या उज्वल भविष्यासाठी त्याच्या संघर्ष असतो.


 ते जागले नाही की आपण अपयशी ठरलो 


 स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीसाठी जो उत्साह मनात असायला हवा होता, विदर्भातील प्रत्येक माणसाच्या मनात जी आग दिसायला हवी होती, ती कुठल्याच आंदोलनात दिसली नाही. फार फार काही आंदोलनात गर्दी दिसली असेल. मनात आग दिसणे म्हणजे कायद्याचा भंग करणे नाही, हे लक्षात घ्या. मनाच्या गाभाऱ्यातून पुढे येणारी तळमळ दिसली नाही, असा त्याचा अर्थ. ही तळमळ का दिसत नाही ? एक तर विदर्भातील जनतेला त्यांच्या मागासलेपणाची जाणीव झालेली नाही, किवा ती जाणीव निर्माण करण्यात आपण अपयशी ठरलो. खरंतर कालच्या आंदोलनात नागपूर जिल्ह्यातील  आणि आसपासच्या जिल्ह्यातील जनतेनी गर्दी करायला हवी होती. किमान नागपूर शहरातील जनतेनी तरी पुढे यायला हवं होतं, तसं झालं नाही. का? याचे कारण शोधण्याची हीच खरी वेळ आहे. वामनराव चटप यांना जीव की प्राण मानणारी जनता त्यांच्यासाठी जीव द्यायला तयार आहे. त्यांच्या प्रत्येक आंदोलनात ही जनता दिसते. पण हा भक्कम आवाज एकाकी पडलाय काय? असे आता वाटू लागले आहे.आता स्वतंत्र विदर्भासाठी ऊन, वारा, पाऊस धारा याचा सामना करणारी माणसे पुढे यायला हवी. वेळप्रसंगी उपाशी राहून रस्त्यावर उभे राहण्याची तयारी असायला हवी. साधं तालुका किंवा जिल्हा निर्मितीसाठी मोठं आंदोलन करायला लागतं, इथे तर राज्य निर्मितीची मागणी आहे. जेव्हा घराघरातून स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीसाठी माणसे पुढे येथील तेव्हाच हे शक्य आहे.


निलेश झाडे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या