हिवरा रेती घाट रेती तस्करी करणाऱ्या नेत्यांसाठी आयतं कुरण ठरलं आहे.घरकुलचा नावावर मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत असल्याचा चर्चा सुरु असताना याच हिवरा गावातील अनेक शेतकऱ्यांचा शेतातील खत चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
हिवरा आणि धाबा शेतशिवार बुधवारचा मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात युरिया खताची चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिवारातील अनेक शेतांपर्यंत रस्त्यांची सुविधा नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आगामी पेरणीचे नियोजन करून आवश्यक तेवढे खत आधीच शेतामध्ये साठवून ठेवले होते. मात्र चोरट्यांनी यावर डल्ला मारला.चार ते पाच कास्तकारांच्या शेतातून अंदाजे शेकडो खताच्या बॅगा चोरीला गेल्याची चर्चा गावभर पसरली आहे. सकाळी शेतकरी शेतात पोहोचल्यानंतर खताचा साठा गायब असल्याचे लक्षात येताच एकच खळबळ उडाली.
या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पेरणीच्या तोंडावर झालेल्या या चोरीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून दोषींना तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे.खत चोरीची ही आतापर्यंतची सर्वात मोठी घटना असू शकते अशी प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

0 टिप्पण्या