विकासाच्या नावाखाली दीड लाख वर्षांचा मानवी इतिहास धुळीस — कॅन्सर हॉस्पिटलच्या समोरील जागेत दडलेला देशाचा अमूल्य वारसा



हिंदू समाजाच्या प्रश्नांबाबत सातत्याने जागरूक राहणारे संघटन म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ओळखले जाते. भारत हा अत्यंत प्राचीन संस्कृतीचा देश आहे. साधू-संतांची परंपरा, तत्त्वज्ञान आणि सांस्कृतिक मूल्यांमुळे कधी काळी सात समुद्रापलीकडील राष्ट्रेही भारताकडे आकर्षित झाली. असे असतानाच, आज याच देशातील मानवी उत्क्रांतीचा एक अत्यंत मौल्यवान इतिहास हळूहळू नामशेष होत आहे.



हा इतिहास आहे अश्मयुगीन मानवाचा — मानवी उत्क्रांतीच्या प्रारंभिक टप्प्यांचा. चंद्रपूर शहरातील एका महत्त्वाच्या अश्मयुगीन पुरातत्वीय स्थळावर आज भव्य कॅन्सर हॉस्पिटल उभे राहिले आहे, ज्याचे उद्घाटन आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे. सनातन धर्माचा जयघोष करणाऱ्या व्यक्तीच्या हस्ते होणारे हे उद्घाटन, एका प्रामाणिक देशभक्ताकडून इतिहासासाठी घातक ठरणारे पाऊल तर नाही ना, अशी चर्चा सध्या जनमानसात सुरू आहे.



चंद्रपूर शहर दोन मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या उद्घाटनांसाठी सज्ज होत असतानाच, एका अत्यंत महत्त्वाच्या पुरातत्वीय स्थळाकडे प्रशासनाने केलेल्या अक्षम्य दुर्लक्षाची बाब चव्हाट्यावर आली आहे.


चंद्रपूरमधील ‘पापामियाँ टेकडी’ हे एक अत्यंत महत्त्वाचे पुरातत्वीय स्थळ आहे. या टेकडीखाली सुमारे दीड लाख वर्षांचा मानवी इतिहास दडलेला आहे. सन १९५९–६० दरम्यान भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला (ASI) येथे मोठ्या प्रमाणावर अश्मयुगीन दगडी हत्यारे आढळून आली होती. मात्र, कालांतराने वाढती लोकसंख्या आणि अतिक्रमणांमुळे या स्थळाचा मोठा भाग झोपडपट्ट्यांनी व्यापला. एकेकाळी विस्तीर्ण भूभागावर पसरलेले हे स्थळ हळूहळू केवळ २५ ते ३० एकरांपर्यंत मर्यादित राहिले आणि प्रशासनाच्या विस्मरणात गेले.



सन २०१४ मध्ये, याच जागेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय स्थापन करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली.

२०१८ साली, मुंबईतील युवा संशोधक अमित भगत यांच्या लक्षात ही गंभीर बाब येताच, त्यांनी हे दुर्मीळ पुरातत्वीय स्थळ वाचवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू केले. पंतप्रधान कार्यालय आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठपुरावा करून त्यांनी राज्य सरकारला हे पटवून दिले की, पापामियाँ टेकडी ही सुमारे दीड लाख वर्षांपासून अश्मयुगीन हत्यारनिर्मितीचे केंद्र राहिली आहे. येथे भूपृष्ठावर तसेच जमिनीखाली लाखो अश्मयुगीन हत्यारे दडलेली आहेत. हे स्थळ केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील सर्वात मोठ्या आणि दुर्मीळ अश्मयुगीन स्थळांपैकी एक आहे.


या ठिकाणी अश्मयुगीन संग्रहालय उभारल्यास ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरेल आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पाशी जोडल्यास पर्यटनाच्या दृष्टीनेही मोठी संधी निर्माण होईल, अशी महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी शासनाला केली होती.



या प्रयत्नांची दखल घेत १४ नोव्हेंबर २०१८ रोजी मुख्यमंत्री कार्यालयात तातडीची उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांनी प्रकल्पासाठी प्रस्तावित १०० एकर जागेपैकी ४ एकर क्षेत्र संरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला. याच जागेवर ‘अश्मयुगीन संग्रहालय’ आणि ‘प्रागैतिहासिक उद्यान’ उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. हे संग्रहालय भारतातील पहिले अश्मयुगीन संग्रहालय ठरणार होते.


मात्र, हा निर्णय काही राजकीय शक्तींना मान्य नव्हता. परिणामी, अवघ्या आठवडाभरातच अमित भगत यांची तातडीने मुंबईला बदली करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.


यानंतर राज्य पुरातत्व विभाग, चंद्रपूर जिल्हा प्रशासन आणि पुण्याच्या डेक्कन कॉलेज यांच्यात त्रिपक्षीय करार झाला. डेक्कन कॉलेजने येथे सखोल सर्वेक्षण करून हजारो अश्मयुगीन हत्यारे गोळा केली आणि या स्थळी मानवी वस्ती पाच ते सहा लाख वर्षे जुनी असल्याचा शास्त्रीय निष्कर्ष नोंदवला. या शोधामुळे ‘मानव आफ्रिकेतून दोन-तीन लाख वर्षांपूर्वी भारतात आला’ या प्रस्थापित सिद्धांतालाच आव्हान मिळणार होते.



२०१९ मध्ये बांधकामासाठी खोदकाम सुरू असताना पुन्हा हजारो हत्यारे आढळून आली. ASIच्या अधिकाऱ्यांनी ती सुरक्षित ठिकाणी ठेवली; मात्र २०२० च्या कोविड काळात प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ती पुन्हा मातीखाली गाडली गेली, आणि हा अमूल्य पुरातत्वीय ठेवा कायमचा नष्ट झाला.

“आपला प्राचीन वारसा ओळखण्याची आणि जतन करण्याची इच्छाशक्ती व दूरदृष्टी प्रशासनाकडे नाही, हेच आपल्या मागासलेपणाचे लक्षण आहे,” असे अमित भगत म्हणतात. त्यांच्या मते, हे प्रकरण केवळ स्थानिक दुर्लक्षाचे नसून, आपल्या राष्ट्रीय पुरातत्वीय वारशावर आलेल्या गहन संकटाचे प्रतिबिंब आहे.


नोव्हेंबर २०२३ मध्ये राज्य सांस्कृतिक मंत्रालयाने ₹५७.९६ कोटींची वारसा पुनरुज्जीवन योजना जाहीर केली; मात्र हा निधी अन्य राजकीयदृष्ट्या लाभदायक योजनांकडे वळविण्यात आला. परिणामी, पापामियाँ टेकडीचा प्रकल्प पुन्हा एकदा दुर्लक्षित राहिला.


आज हे स्थळ क्रेन, काँक्रीट आणि धुरळ्याखाली गाडले जात आहे. मानवी इतिहासाच्या प्रारंभाची साक्ष देणारे हे स्थळ ‘विकासाच्या’ नावाखाली इतिहासातूनच पुसले जाण्याच्या टप्प्यावर उभे आहे.

पापामियाँ टेकडी ही केवळ एक संग्रहालयाची जागा नाही, तर मध्य भारतातील मानवी वस्तीच्या उत्क्रांतीचा अभ्यास करणारे एक अत्यंत महत्त्वाचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र होऊ शकते. त्यामुळे, या स्थळाकडे झालेले दुर्लक्ष म्हणजे आपल्या सामूहिक स्मृतीचा ऱ्हास आहे.



आज चंद्रपूर शहर उद्घाटनाच्या फिती कापण्यासाठी सज्ज असताना, या पुरातत्वीय स्थळाकडे होणारे दुर्लक्ष ही केवळ प्रशासकीय चूक नव्हे — ती एक ऐतिहासिक शोकांतिका ठरण्याची भीती आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या