चंद्रपूर ( विश्लेषण )
आज विज्ञानाने मानवाला विश्वाच्या अगणित रहस्यांपर्यंत नेले असताना, अजूनही “जगाचा निर्माता कुणीतरी दिव्यपुरुष आहे” या अंधश्रद्धेवर अढळ विश्वास ठेवणाऱ्यांना सजीवांमध्ये कालौघात बदल घडतात, ही साधी वैज्ञानिक सत्यता स्वीकारणे अवघड जाते. सजीवांचे अस्तित्व, त्यांचे टिकून राहणे आणि त्यांची प्रगती ही नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेवर आधारित असते—ज्यात पर्यावरणाशी जुळवून घेणारे, उपयुक्त गुणधर्म असलेले जीवच टिकतात, प्रजनन करतात आणि ते गुण पुढील पिढ्यांमध्ये संक्रमित होतात. ह्याच दीर्घ, संथ पण सातत्यपूर्ण प्रक्रियेतून उत्क्रांती घडते. अशा ठोस वैज्ञानिक आधारांवर उभा असलेला डार्विनचा सिद्धांत मग स्वीकारला जाणार तरी कसा—जेव्हा श्रद्धा विचारांवर मात करते?
आपण एखाद्या दिव्यपुरुषाची संतती आहोत, या भावनिक समजुतीत वाढलेल्या समाजाला डार्विनने “मानवाचे पूर्वज माकडसदृश होते” असे सांगितले, तेव्हा हादरून जाणे स्वाभाविक होते. “सर्वात बुद्धिमान” समजल्या जाणाऱ्या मानवाचे पूर्वज माकड? ही कल्पनाच अनेकांना असह्य वाटली. परिणामी डार्विनला वेड्यात काढण्यात आले. पण प्रश्न हा नाही की लोकांना धक्का बसला—खरा प्रश्न हा आहे की डार्विन चुकला होता काय? की आपण सत्य स्वीकारण्याची मानसिक तयारीच कधी केली नाही?
इतिहास स्पष्ट सांगतो—आपले पूर्वज नग्नावस्थेत, गुहांमध्ये राहत होते. दगडी हत्यारांच्या साहाय्याने त्यांनी जगण्याची लढाई लढली, निसर्गाशी संघर्ष केला आणि हळूहळू आजचा तथाकथित “प्रगत” मानव घडविला. जर त्या इतिहासाच्या कलेवरावर उभा राहून आपण विकासाची इमारत उभारत असू, तर दगडाच्या साधनांनी जीवन जगणाऱ्या, मानवी अस्तित्वाची व्याप्ती वाढविणाऱ्या आपल्या आदिम पूर्वजांच्या वारशावर पाय देणे ही निव्वळ विकासाची नव्हे, तर घोर कृतघ्नतेची आणि बौद्धिक दारिद्र्याची खूण ठरते.
मग प्रश्न उपस्थित होतो—विकासासाठी खरंच विकासपुरुषांना दिसलेली ती एकमेव टेकडीच होती काय?
जगाच्या पातळीवर ओळख निर्माण करण्याची क्षमता असलेली चंद्रपूर जिल्ह्यातील दोन अत्यंत महत्त्वाची पुरातत्त्वीय स्थळे आज नामशेष झाली आहेत. एक—डायनासोरचे गाव म्हणून ओळखले जाणारे पिजदुरा, आणि दुसरे—पापामियाँ टेकडी. या स्थळांचे शास्त्रीय जतन व संवर्धन झाले असते, तर ही स्थळे केवळ जिल्ह्याची किंवा राज्याची नव्हे, तर संपूर्ण जगाची ओळख बनली असती. पर्यटन, संशोधन आणि ज्ञाननिर्मितीची केंद्रे म्हणून ती आज जगाच्या नकाशावर ठळकपणे झळकली असती.
परंतु इथल्या सत्ताधाऱ्यांना आणि नियोजनकर्त्यांना काँक्रीटचे जंगल उभे करणे म्हणजेच विकास, असा अत्यंत संकुचित आणि आत्मघातकी अर्थ स्वीकारलेला दिसतो. हा विकासाचा गैरसमज नसून, आपल्या सांस्कृतिक, वैज्ञानिक आणि ऐतिहासिक वारशाविषयीची क्रूर उदासीनता आहे. इतिहास पुसून, पुरावे नष्ट करून आणि स्मृतींची हत्या करून घडवलेला विकास हा प्रगती नसून—तो केवळ भविष्यहीन विनाशाचा आराखडा आहे


0 टिप्पण्या