मनपा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. कुणाचा कुठे ताळमेळ नाही. भाजप तर गोंधळलेला पक्ष ठरला आहे. त्यांचा उमेदवारांना मतदार हाकलून लावीत आहेत. बॅनरवरील फोटोवर शाही फेकत आहेत. यदाकदाचित भाजप सत्तेवर आलाच तर पहिला प्रश्न पुढे येईल, कोण जिंकला ? माजी मंत्री की विद्यमान आमदार? पुन्हा तेच ' शेणफेक ' सुरु.मी ' आतला ' तू ' बाहेरचा '. यातूनच भाजपचे नेते अद्याप बाहेर पडलेले नाहीत.काँग्रेसचं तर विचारूच नका. हिंग गेला पण वास गेली नाही, अशी अवस्था. हातात काही उरलं नसताना तोरा कायम. आसवानी शेती पिकविता येत नाही, कोण सांगणार? आता रडणे काही कामाचे ठरणार नाही. ब्रह्मपुरीचे ' भाऊ ', त्यांना राज्याचा राजकारणाकडेही लक्ष द्यावे लागते. इथल्या ( चंद्रपूरातील ) बंधू प्रेमापुढे ते ही हरलेत. बंधू तोंडघशी पडला पण 'ताई ' नी काही बोध घेतलेला दिसत नाही. त्यांना वाटते मंचावर उभं होऊन थोळं रडलं तर काम फत्ते. त्यांना कोण सांगणार ' तुम्हचा अश्रुत आता तेवढी ताकद उरलेली नाही '. शेवटी काँग्रेस पक्ष आपटला तर ठरलेले उत्तर! मशीनने घात केला. ही खरंतर पळवाट आहे. चूक मान्य करण्याची मासिकता काँग्रेसच्या नेत्यात उरलेली नाही. ते हवेत उडत असतात.
या धामधूमीत एका शेतकऱ्यावर झालेला अमानुष प्रकार पुढे आला. राजकारण बाजूला ठेवून लोकप्रतिनिधिनी एक होऊन न्याय देण्यासाठी पुढे येणे खरंतर हे त्यांचे कर्तव्य होतं. इथे ते मागे पडलेत. बच्चू कडू पुढे आलेत. केवळ वरवर ते पुढे आले नाहीत, ते रस्त्यावर उतरलेत. काही याला राजकीय खेळी असं नाव देतील.ही केवळ राजकीय टीका ठरेल. कडू यांनी चंद्रपूरातील केवळ शेतकरीच नाही तर विचार करणाऱ्या प्रत्येक माणसाचा मनात जागा निर्माण केली. शेतकरी नेते ऍड. वामनराव चटप यांनी पीडित शेतकऱ्याची भेट घेतली. सोबत असल्याची ग्वाही दिली. अनेक सामाजिक संघटनानी, माध्यमानी हा विषय लावून धरला.काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची त्या शेतकऱ्याला मोठी मदत झाली आहे.बाकीच्यांचे काय? त्यांनी भेट घेतली असेलही ही भेट राजकीय ठरली मात्र बच्चू कडू याला अपवाद ठरलेत. सर्वावर भारी ठरलेत. चंद्रपूरचा शेतकऱ्याचा दुःखाशी कडूचे काय घेणंदेणं? पण शेतकऱ्यांचा दुःखाशी समरस झालेला हा माणूस मोठा ठरला.नावात कडू हा शब्द असला तरी त्या शेतकऱ्यांसाठी त्यांचा मनात गोड तळमळ आहे, हे यातून दिसून आले.


0 टिप्पण्या