ऑटो व दुचाकीची समोरासमोर धडक; एक ठार, एक गंभीर
*धाबा :-* गोंडपिपरी–बोरगाव मार्गावर मंगळवारी (दि. १३) सकाळी ११.३० वाजता ऑटो आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात एकाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. बोरगाव नाल्याजवळ बोरकुटे यांच्या शेतालगत असलेल्या धोकादायक वळणावर हा अपघात झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
बोरगाव येथून गोंडपिपरीकडे येणाऱ्या ऑटो रिक्षामध्ये (क्रमांक एमएच ३४ बीएच २३७९) दोन प्रवासी होते. याचवेळी गोंडपिपरीकडून बोरगावकडे वेगाने जाणारी दुचाकी (क्रमांक एमएच ३४ बीएक्स १२४९) वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट ऑटोवर आदळली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की दुचाकीस्वार रस्त्यावर फेकला गेला या अपघातात दुचाकी चालक, आरोग्यसेवक सौरभ पिंपळशेंडे हे गंभीर जखमी झाले आहेत. तर ऑटोमधील प्रवासी करण मोतीराम आत्राम (वय २६, रा. चेक बेरडी) यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी मृत घोषित केले.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यास सहकार्य केले. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार रमेश हत्तीगोटे व प्राथमिक तपास अधिकारी देविदास सुरपाम यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली.
जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालय, गोंडपिपरी येथे दाखल करण्यात आले. दुचाकीस्वार सौरभ पिंपळशेंडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.
दरम्यान, सदर वळणावर यापूर्वीही अनेक अपघात घडल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत असून, या ठिकाणी वेगमर्यादा दर्शक फलक, स्पीड ब्रेकर तसेच अन्य रस्ते सुरक्षा उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणी पुढील तपास ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


0 टिप्पण्या