चंद्रपूर
शासकीय कामासाठी हवी तेवढी रेती मिळतं असताना घरकुलासाठी रेती मिळवीताना सामान्य माणसांना मोठा आटापिटा करावा लागत आहे.याचा लाभ रेती तस्करांनी उचलला आहे. रेती घाटावरून अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटला या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना जिल्हातील गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या फुरडीहेटी–वढोली मार्गावर आज ( बुधवार ) सहा वाजता घडली आहे.संतोष मडावी असे मृतकाचे नाव आहे तर साहिल कोवे हा गंभीररित्या जखमी आहे.
गोंडपिपरी तालुक्यातुन मोठ्या प्रमाणात रेती तस्करी केली जाते. याकडे महसूल विभागाचे कायमचे दुर्लक्ष झाले आहे. एकीकडे शासकीय कामासाठी हवी तेवढी रेती उपलब्ध होत असताना घरकुल लाभार्थ्यांना मात्र अवैधपणे रेती तस्करी कारण्याऱ्यावर अवलंबुन राहावे लागत आहे.या तस्करीने आज एकाचा नाहक जीव गेला आहे.प्राप्त माहितीनुसार,गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा रेती घाटावरून चेक बोरगाव येथील घरकुल लाभार्थ्यासाठी रेती घेऊन ट्रॅक्टर निघाला. हा ट्रॅक्टर विना नंबरचा होता.महसूल आणि पोलीस विभागापासून बचाव करण्यासाठी भरधाव वेगाने निघाला. दरम्यान फुरडीहेटी–वढोली मार्गावर ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर रस्त्याखाली पलटली. ट्रॉलीवर संतोष सुंदरशहा मडावी (वय २४) व साहिल कोवे हे दोघे बसले होते.अपघात इतका भीषण होता की संतोष मडावी याचा जागीच मृत्यू झाला, तर साहिल कोवे हा जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच गोंडपिपरी पोलिस ठाण्याचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे व पोलिस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.
या प्रकरणी ट्रॅक्टर चालक आकाश गोरकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास गोंडपिपरी पोलिस करीत आहेत.मृतक संतोष सुंदरशहा मडावी हा तरुण असून त्याच्या पश्चात आई-वडील व पाच भाऊ असा परिवार आहे. कुटुंबातील आधारवड असलेल्या तरुणाचा अकाली मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अवैध टिप्पी
घटनेनंतर टीपीवर टाकण्यात आलेला ट्रॅक्टर क्रमांक चुकीचा होता.संबंधित ट्रॅक्टर यापूर्वीच फायनान्स कंपनीने जप्त केला असल्याची माहिती आहे. ज्या ट्रॅक्टरद्वारे रेतीची वाहतूक सुरू होती त्या ट्रॅक्टरवर कोणताही क्रमांक नव्हता.


0 टिप्पण्या