हिरवे जंगल रक्ताळले : चंद्रपूर जिल्ह्यातील गुंजेवाही जंगलात थरकाप!
चंद्रपूर
चंद्रपूर जिल्हातील जंगल आज शहारलं. तेंदूची हिरवी पाने रक्ताने लाल झाली. तेंदू संकलनासाठी अगदी पहाटे गेलेल्या महिलांवर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात चार महिलांचा बळी गेला आहे. या घटनेने जिल्हात खळबळ उडाली आहे.कवडूबाई दादाजी मोहुर्ले (45 ),अनुबाई दादाजी मोहुर्ले (46 ),संगीता संतोष चौधरी (36),सुनीता कौशिक मोहुर्ले (33) अशी मृतकांची नावे आहेत.चंद्रपूर जिल्ह्यातील गुंजेवाही जंगलात ही घडली आहे.
प्राप्त माहितीनुसार, सध्या जिल्हात तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम सुरु आहे. तेंदूची पाने तोडण्यासाठी अगदी पहाटेचा अंधारात गावकरी जात असतात.सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही येथील अनुबाई दादाजी मोहुर्ले, संगीता संतोष चौधरी, कवडूबाई दादाजी मोहुर्ले, सुनीता कौशिक मोहुर्ले या तेंदू संकलन करण्यासाठी जंगलात गेल्या. तेंदू संकलन करीत असताना अचानक वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. या महिलांसोबत तेदू संकलन करण्यासाठी इतरही महिला होत्या. त्यांच्याबाबत माहिती अद्याप पुढे आलेली नाही. वनविभाग आणि गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आहे. पुढील तपास सुरू आहे.

0 टिप्पण्या