तेलंगणा प्रशासनाची मुजोरी, देविदास सातपुते संतापले, नेमक काय घडलं ?

 


महाराष्ट्र - तेलंगणा राज्याला जोडणारा वर्धा नदीवरील पूल तेलंगणा सरकारने वाहतुकीसाठी केला बंद


हजारो नागरिकांचे हाल, रुग्णवाहिकेलाही नो एंट्री, सीमा भागात जनजीवन विस्कळीत 


 महाराष्ट्र व तेलंगणा राज्यांना जोडणारा वर्धा नदीवरील महत्त्वाचा पूल आणि राज्य महामार्ग क्रमांक 369 (SH-369) रस्ता खराब होत असल्याने अचानक बंद करण्यात आल्याने सीमावर्ती भागातील हजारो नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिरपूर (तेलंगणा) पोलिस विभागाने कोणतीही अधिकृत नोटीस किंवा शासकीय आदेश न देता लोखंडी अडथळे उभारून हा मार्ग बंद केल्याचा आरोप सीमेवरील ग्रामपंचायत पोडसाने केला आहे.


ग्रामपंचायत पोडसाचे सरपंच व प्रशासक देविदास सातपुते यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री यांच्याकडे तशी तक्रार सुधा दाखल केली आहे. 2008 मध्ये वर्धा नदीवर बांधण्यात आलेला हा पूल पोडसा (महाराष्ट्र) आणि वेंकटरावपेट (तेलंगणा) यांना जोडतो. या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया कायदेशीररीत्या पूर्ण झाली असून,महाराष्ट्र शासनाने संबंधित नुकसानभरपाईही दिली होती. गेल्या 15 वर्षांपासून हा मार्ग सार्वजनिक वापरात आहे. मात्र अलीकडे अचानक हा रस्ता बंद करण्यात आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः हैदराबादकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकांसाठी हा प्रमुख मार्ग असल्याने वैद्यकीय आपत्कालीन सेवांवर गंभीर परिणाम होत असून रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून शेतकरी व व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे,कारण हा मार्ग छत्तीसगड,मध्यप्रदेश व महाराष्ट्राला दक्षिण भारताशी जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे.ग्रामपंचायतीने या कारवाईला संविधानातील कलम 19(1)(d) नुसार मिळालेल्या हालचालीच्या स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निर्देश देऊन अडथळे हटवावेत आणि SH-369 वरील वाहतूक त्वरित पूर्ववत करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. दरम्यान,या मुद्द्यावर सीमावर्ती भागात संतापाची लाट उसळली असून,लवकरात लवकर मार्ग सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.



Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या