विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; वन्यजीव संरक्षणाबाबत केले मार्गदर्शन
गोंडपिपरी
वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून वनपरिक्षेत्र धाबा अंतर्गत गोंडपिपरी येथे वन विभागाच्या वतीने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविला.
वन्यजीवांचे संरक्षण, वनसंपदेचे संवर्धन आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याबाबत रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. वन्यप्राणी हे निसर्गचक्रातील अत्यंत महत्त्वाचे घटक असून, त्यांच्या संवर्धनासाठी समाजातील प्रत्येक घटकाने जबाबदारीने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
रॅलीनंतर विद्यार्थ्यांना वन्यजीवांचे महत्त्व, वन्यप्राण्यांचा नैसर्गिक अधिवास, जैवविविधतेचे संवर्धन तसेच मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. वन्यप्राण्यांबाबत असलेले गैरसमज दूर करून त्यांच्या संरक्षणासाठी नागरिकांनी वन विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
मध्य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक वाघाये, सहाय्यक वनसंरक्षक (वन्यजीव) शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच धाबा वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर गोरकार यांच्या नेतृत्वात रॅलीचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाला जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक कोकाटे, दीपक वांढरे, क्षेत्र सहायक पुरी, वनपाल आवळे, वनरक्षक नागरे, झारखंडे, कातकर, मेश्राम, बोकडे, भिवापुरे, मारगोनीवार आदी उपस्थित होते.
मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून, समाजातील नागरिकांनीही वन्यजीव संवर्धनात आपले योगदान द्यावे, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर गोरकार यांनी केले.

